शुभप्रसंगीची कलंक-सूचक गाणी : गारी गीते

शिव्यांची गाणी??? छ्या!! कल्पनाच करवत नाही ना? पण भारताच्या लोकपरंपरेत अशी एकमेकांना प्रेमळ शिव्या दिलेली सवंग गाणी मनोरंजनाच्या हेतूने गाण्याची जुनी प्रथा आहे. 
अगदी परवा परवा पर्यंत मला या प्रकाराबद्दल काहीही माहिती नव्हती. त्याचे असे झाले, भारतीय लोकगीतांच्या विविध प्रकारांचे वाचन करत असताना एक दिवस नजर अचानक एका गीत प्रकारावर येऊन थबकली. तो प्रकार होता 'गारी गीत', किंवा 'गारी'. हिंदी भाषेत गारी म्हणजे 'गाली' उर्फ शिवी एवढे माहीत होते. मग आता ही गाण्यातील गारी कोठून निपजली, म्हणून तिच्याविषयी आणखी वाचत गेले -- आणि लोकपरंपरेतील  एका मजेशीर साहित्यप्रकाराची त्या निमित्ताने ओळख होऊ लागली.

रूढार्थाने गारीचा अर्थ शिवी असा असला तरी गारी गीतांमध्ये दिल्या जाणार्‍या ''शिव्या'' या हास्य उत्पन्न करण्याच्या हेतूने, मनोरंजनाच्या हेतूने दिल्या गेलेल्या शिव्या आहेत. त्यांच्यात व्यंगात्मक विनोदाचे यथार्थ दर्शन तर होतेच, शिवाय ज्या प्रकारे या शिव्या गीतातून सामूहिक रितीने ''गाऊन'' दिल्या जातात तोही प्रकार रोचक आहे. या गारी गीतांना विवाह व इतर शुभ कार्यांच्या वेळी गायले जाते. लोकमनोरंजनासाठी त्यात कलंक-सूचक गोष्टींचा आशय असतो. खास करून स्त्रिया ही गीते गातात.  मर्मभेदी, अपमानजनक अशी गारीगीते माळवा, बुंदेलखंड, बिहार, राजस्थान, वृंदावन, छत्तिसगढ इत्यादी प्रांतांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत. विवाहासारख्या  कार्यात व्याह्यांचे स्वागत करताना, त्यांचे आदरातिथ्य करताना आणि भोजन प्रसंगी एकमेकांची उणीदुणी थट्टेच्या आवरणाखाली काढत काढत हास्यफवार्‍यांच्या साथीने आपल्या नरम विनोद बुद्धीची चुणूक दाखवणारी ही गारी गीते म्हणजे भारताच्या लोकपरंपरेतील उपहासगर्भ रचनाच म्हणता येतील!
संत तुलसीदासांनी या गारी गीताचे यथार्थ वर्णन केले आहे : जेंवत देहिं मधुर धुनि गारी । लै लै नाम पुरुष अरु मारी ।
प्रेमात दिलेली गारी ही कविवर्य रसखान यांच्या म्हणण्यानुसार - 'ऐसी गारी पै सौ आदर बलिहारी है।' अशी असते. लग्नाची वरात लग्नमंडपाच्या द्वारी येते तेव्हा आणि लग्नाच्या भोजनसमयी स्त्रिया गारी गीतांचे गायन करतात आणि सोबत हेही सांगतात, ''बरातियों बुरौ मत मानियौ हमारौ हंसबे को सुभाव।'' व्याह्यांना त्यांची विहीण जेव्हा रसपूर्ण शब्दांत गारी गीते सुनावते तेव्हा ती ऐकणार्‍यांचा श्रमपरिहार तर होतोच, परंतु त्या चटकदार, रसाळ शब्दांनी त्यांच्या मनातही हास्य-आनंदाचा भाव निर्माण होतो असे म्हणतात! 
लोककवी वृन्द या 'समधिन' किंवा विहिणीने दिलेल्या गारीचे वर्णन करतात :
निरस बात सोई सरस जहाँ होय हिय हेत।

गारी भी प्यारी लगै ज्यों-ज्यों समधिन देत॥

काही वर्षांपूर्वी दिल्ली - ६ नावाने आलेल्या हिंदी चित्रपटातील एका गीतात 'सास गारी देवे, ननंद मुंह लेवे, देवर बाबू मोर, संइया गारी देवे, परोसी गम लेवे, करार गोंदा फूल' या शब्दांत असलेली गारी बर्‍याचजणांना आठवत असेल. एकमेकांचे रहस्यभेद करणे, कुचेष्टा करणे हे वर-वधू पक्षाकडील लोकांना या प्रकारच्या गीतांमधून शक्य होत असावे. आपल्या वैशिष्ट्यपूर्णतेबरोबरच उपस्थितांचे रंजन करण्याचा वारसा चालवणारी गारी गीते लग्नसमारंभासारख्या शुभकार्यामधील ताण हलका करण्याचे काम करतात. ही गीते बहुतांशी सामूहिक रित्या गायली जातात. नथीतून तीर मारणे, प्रतिपक्षाला या शाब्दिक खेळांतून टोले लगावायचा उद्देश त्यातून साधला जात असावा. त्यांचा आशय कुचेष्टेचा असला तरी ती 'हलकेच' घेण्याचा पारंपारिक संकेत असल्यामुळे त्यांच्याकडे हास्यविनोदाच्या चश्म्यातूनच पाहिले जात असावे.  

शिवाय या गीतांमागील मानसिकता अभ्यासू जाता लोकपरंपरेतील एक गमतीशीर समज समोर येतो. तो म्हणजे विवाहासारख्या कोणत्याही शुभ, मंगल कार्यात जर अशा पद्धतीने 'गारी' दिली गेली तर ते कार्य व उत्सवमूर्ती दृष्टावत नाहीत. कारण लोकांच्या मनातील नकारात्मक विचार, भावनांचा निचरा 'गारी गीता'तून होत असावा. 

गारी गीतांची भाषाही खटकेबाज, लयदार, मस्तमधुर आहे. परंपरेला अनुसरून घुंगट - पडद्याच्या आड वावरणार्‍या स्त्रियांनी रचलेल्या - गायलेल्या गीतांमधील आशय कित्येकदा रांगडा, धीट, सूचक आढळतो. म्हटले तर हा 'विरोधाभास'च म्हणता येईल!

आता ह्या गारी गीतात व्याह्यांची ''अक्कलहुशारी'' कशी निकालात काढली आहे, पाहा तरी!

मेरे समधी बडे होसियार नाम इनका सुन लो जी

मच्छर मार आये समधी जी नाम पडा तीसमार
नाम इनका सुन लो जी| मेरे.

लुंगी के बदले में साया पहन लिया
बन गये नवेली नार समधी गंवार देखो जी

छुरी कैंची रखते है पास एक नंबर के है पाकेटमार
नाम इनका सुन लो जी| मेरे.

म्हणजे, बघा माझे व्याही किती हुशार आहेत! त्यांचे नाव तर तुम्ही ऐकलेच असेल. ते डास मारून आले आहेत. त्यामुळे त्यांचे नाव तीसमार खाँ पडले आहे. लुंगीऐवजी ते परकर नेसून आलेत! अगदी अवखळ तरुणीच्या थाटात ते सजले आहेत. कसे अडाणी आहेत हे व्याही! जरा बघा तरी त्यांच्याकडे - जवळ सुरी, कात्री ठेवतात ते! एक नंबरचे पाकिटमार आहेत हे व्याही. त्यांचं नाव तर तुम्ही ऐकलंच असेल!!!

गारी गीताची ही आणखी एक चुणूक :
अइसन बराती न देखे अभी तक जिया होय धकी-धक.
केहू के एक आँख केहू के दुई आँख,
केहू के एक्कौ न ताकैं टकी-टक; जिया होय धकी-धक.
केहू के एक हाथ केहू के दुई हाथ,
केहू के एक्कौ न खाँय गपी-गप; जिया होय धकी-धक.
केहू के एक गोड़ केहू के दुई गोड़;
केहू के एक्कौ न कूदैं घपी-घप; जिया होय धकी-धक

गाण्याचा भावार्थ असा : असे कसे हे लग्नाच्या वर्‍हाडातील लोक? यांच्यासारखे वर्‍हाडी पाहिले नाहीत हो अगोदर!! कोणी एका डोळ्याने तर कोणी दोन्ही डोळ्यांनी पाहा तरी आमच्याकडे कसे डोळे फाडफाडून टकमका बघताहेत, की आमच्या हृदयाचे ठोके वाढवत आहेत! कोणी एका हाताने तर कोणी दोन्ही हातांनी बघा कसे गपागप खात आहेत! कोणी एका पायाने तर कोणी दोन्ही पायांनी धपाधप उड्या मारत आहेत.... आमच्या हृदयाचे ठोके वाढवत आहेत!! 

आणि स्त्रियांनी रचलेला हा व्यंगपूर्ण कल्पना-विलास बघा तरी!

समधी भडुआ पीटे कपार हमरा करम में जोरू नहीं है |

बराती भडुआ पीटे कपार हमरा करम में जोरू नहीं है |
दौडल गईलन कागज के दुकान पर कागज के दुकान |

कागज के जोरू बना मैया हमरा करम में जोरू नहीं है |
कागज के जोरू बगल में बैठाया पलंग पर सोलाया |

हवा बहत उडी जाये बाबू हमरा करम में जोरू नहीं है |
दौडल गईलन कुम्भार के दुकान पर कुम्भार के दुकान |

माटी के जोरू बगल में बैठाया पलंग पर सोलाया |
बूँद पडत गल जाये बाबू हमरा करम में जोरू नहीं है |

दौडल गईलन सोनार के दुकान पर सोनार के दुकान |
सोना के जोरू बना बाबू हमरा करम में जोरू नहीं है |

सोना के जोरू बगल में बैठाया पलंग पर सोलाया |
चोर चोरा के ले जाये बाबू हमरा करम में जोरू नहीं है | 

या गाण्यातही व्याह्यांना 'गाली' दिली आहे. व्याही कपाळ बडवत आहेत. त्यांच्या नशीबातच बायको नाही! वर्‍हाडी लोक देखील कपाळ बडवत म्हणत आहेत, ''अरे देवा! आमच्या नशीबातच बायको नाही!''
पळत पळत ते कागदाच्या दुकानात गेले व त्यांनी कागदाची बायको बनवली. तिला आपल्या शेजारी बसवले,  पलंगावर झोपवले. पण हाय रे दैवा! जोराच्या वार्‍याने कागदी बायको उडून गेली. मग त्यांनी पळत जाऊन कुंभाराकडून मातीची बायको बनवून आणली. तिला आपल्या शेजारी बसवले,  पलंगावर झोपवले. पण हाय रे दैवा!  पावसाच्या पाण्याने बायको विरघळली! मग त्यांनी पळत जाऊन सोनाराकडून सोन्याची बायको बनवून आणली. पण चोराने ती बायको चोरी केली! हाय रे दैवा.....ह्याला म्हणतात, यांच्या नशीबातच बायको नाही!!!   


लग्नाची वरात वधूच्या द्वारी लग्नमंडपापाशी येऊन पोहोचते तेव्हा त्या मंडळींना 'तिलक' करून अगोदर त्यांचे पूजन करतात, आणि मग गारी देतात!!! (तिलकाचे वेळी गाण्याच्या गीतात वराकडचे लोक वधूकडच्या लोकांना 'तुम्ही अमक्या तमक्या गोष्टी द्यायचे कबूल केलेत - पण त्या न देता आम्हाला फसवलेत' म्हणून गारी देतात!) बिहार प्रांतांतील लोकगीतांत लग्नप्रसंगी व्याह्यांचे स्वागत करताना त्यांना अशा प्रकारे 'गारी' द्यायची पद्धत आहे : 

स्वागत में गाली सुनाओ मोरी सखिया

यह समधी भडुआ को टोपी नहीं है
कागज के टोपी पेन्हाओ पेन्हाओ मोरी सखिया | स्वागत.

इस भैसुर भरूआ को कुरता नहीं है
बोडे का कुर्ता सिलाओ मोरी सखिया | स्वागत.

इस भैसुर भडुआ को धोती नहीं है
बीबी का साया पेन्हाओ पेन्हाओ मोरी सखिया | स्वागत.

इस बराती भडुआ को माला नहीं है
जूते का माला मँगाओ मँगाओ मोरी सखिया | स्वागत.

अगं सख्यांनो, वर्‍हाडी लोक दाराशी येऊन उभे ठाकले आहेत. त्यांच्या स्वागतासाठी त्यांना 'गाली' द्यायलाच हवी!
या व्याह्यांकडे टोपी नाही. त्यांना कागदाची टोपी घालायला पाहिजे. या मोठ्या दीरांकडे कुडता (अंगरखा) नाही. यांच्यासाठी मांजरपाटाचा (गोणीच्या कापडाचा) कुडता शिवायला घ्या गं सख्यांनो! या मोठ्या दीरांकडे धोतरच नाही! त्यांना त्यांच्या बायकोचा परकर घालायला दिला पाहिजे! या वर्‍हाड्याकडे माळ नाही. म्हणून त्यांना चपलांची माळच घालायला पाहिजे!! 

आणखी एका स्वागत - गीतात गारी देताना स्त्रिया वराच्या पित्याला - व्याहीबुवांना लक्ष्य करून हे गीत गातात :

तिली अरोरो चाँमर फटको
जाइ समधी कों घर धरि पटको |

बाजे ऊ न लायो बजाइबे कों
साजन की पौरि काए कों आयों थुकाइबे कों ||

अर्थ : तीळ सांभाळून ठेवा. तांदूळ पाखडून घ्या. ह्या व्याह्यांना घरी आणून आदळा. हा माणूस इतका कंजूष आहे की त्याने वरातीबरोबर वाजवायला बँडबाजादेखील आणला नाही! एवढेसे कामही त्याला जमले नाही! मग आमच्या सारख्या प्रतिष्ठित लोकांना अपमानित करण्यासाठी आमच्या दारी का आला होता हा? 

एका गीतात विहीण व्याह्यांचे स्वागत करते तर ते तिचा उपहास करतात. विहीण म्हणते, 'व्याहीबुवा, तुमच्याशी आज आमचे मिलन झाले. आम्ही स्वतःला भाग्यशाली समजतो की तुमचे आमचे आज मिलन झाले.' त्यावर मुलीच्या सासरचे लोक व्याह्याच्या वतीने गातात, ''अहो विहीणबाई, तुमचा शेला फारच स्वस्त आहे बुवा! अगदीच कवडीमोल.... आणि माझे धोतर बघा किती किंमती आहे - एका परगण्याएवढी त्याची किंमत आहे! ओ विहीणबाई, तुमचा लेहंगा देखील फारच स्वस्त आहे बुवा! त्या मानाने माझे धोतर अतिशय महाग आहे!''  

भोजनप्रसंगी गाण्याच्या गारी गीतांमध्ये प्रभू रामचंद्र सीतामाईसह जेव्हा अयोध्येत आले तेव्हा त्यांच्या स्वागतार्थ व सन्मानार्थ अयोध्यावासियांनी कशा प्रकारे उत्सव साजरा केला, सर्व नगरजनांना व अतिथींना राजा दशरथाने कसे भोजन दिले, त्याची तयारी कशी केली इत्यादी रसपूर्ण वर्णन मोठ्या तन्मयतेने केलेले आढळते. पण त्या खेरीज इतर गारी-गीतांमध्ये लग्नातील वर्‍हाडाच्या खाण्यापिण्याच्या लकबींबद्दल उपहास केलेला दिसतो. आता ही बुंदेलप्रांतात प्रचलित ज्योनार गालीच पाहा ना! 

बुंदेली ज्योनार गारी (जेवायच्या वेळी गाण्याचे गारी गीत)

कौना की पातर में का का सबाद बाबाजू
हमारे राम जियारे बाबाजू

आलू खा लये रतालू खा लये सेमें सटक गये बाबाजू | हमारे....
पूडी खा लई कचौडी खा लई गुजिया सटक गयी बाबाजू | हमारे...
लड्डू खाये पेडा खाये सो बरफी खा डारीं बाबाजू | हमारी....
रायतो पी लओ खीर पी लई पानी डकर गये बाबाजू | हमारे...
लाँगो चाब लई लायची चाब लई बीडा रचा लऔ बाबाजू | हमारे...
मूँछे मरौडी पहिरीं पनैया चल दये बाबाजू | हमारे...
कौना की पातर में का का सबाद बाबाजू...

अर्थ : हे बाबाजी! कोणकोणत्या पात्रात कोणकोणत्या पदार्थांचा स्वाद आहे सांगा बरं! आमचे व्याही एकाच वेळी सर्व पात्रांमधील पदार्थांचा आस्वाद घेऊ पाहतं आहेत. हे भगवान! त्यांना जिवंत ठेव रे बाबा! त्यांनी बटाट्याची भाजी खाल्ली, रताळ्याची भाजी चापली आणि डाळ - उसळ तर न चावताच गटकावून टाकली. पुर्‍या खाल्ल्या, कचोरी खाल्ली आणि गुजिया त्यांनी घाईघाईत तशाच चव न घेताच गिळल्या! व्याह्यांनी लाडू खाल्ले, पेढे खाल्ले आणि बर्फी तर खाऊन संपवूनच टाकली! त्यावर आमच्या व्याह्यांनी रायते प्यायले, खीर प्यायली आणि एवढे खाऊनही त्यांनी ढेकर दिली नाही! ते रिकामपोटीच राहिले!! व्याह्यांनी लवंगा खाल्ल्या, वेलदोडे चावले, पानाचा विडा चघळला आणि मिशांना ताव मारून वहाणा घालून ते चालते झाले. अरे ओ व्याहीबाबू, एवढे तरी सांगून जा की तुम्हाला कोणकोणत्या पात्रातील पदार्थाचा कोणकोणता स्वाद मिळाला! 

अशाच आशयाचे हे माळवी गारी गीत : 
काए उठी बैठे औरू लै लेते
काए उठी बैठे औरू लै लेते ||

पूरी लै लेते - कचौरी लै लेते
अपनी बैंहना को लडुआ औरू लै लेते ||

बर्फी लै लेते - जलैबी लै लेते
अपने मैंया को कारोजाम औरू लै लेते ||

आलू लै लेते - कद्दू लै लेते
अपनी बुआ को अरईं औरू लै लेते ||

अर्थ : वर्‍हाडी लोक भोजनास बसलेले असताना वधू पक्षाकडचे लोक वरपक्षाकडील लोकांना आणखी खाण्याचा आग्रह करत आहेत, कोकिळवचनी व्यंगात्मक विनोदाने भरलेले गीत गात आहेत. ''भोजन करणे थांबवलेत कशाला? आणखी काही खायचे होते. पूरी-कचोरी खायची होती. ते नाहीतर किमान आपल्या बहिणीसाठी लाडू तरी घ्यायचेत. बर्फी-जिलबी आणखी घ्यायचीत. ती नाही तर आपल्या आईसाठी आणखी गुलाबजाम तरी ठेवून घ्यायचेत! बटाट्याची आणि भोपळ्याची भाजी आणखी घ्यायचीत. आपल्या आत्यासाठी किमान अरबीची भाजी तरी आणखी घ्यायचीत!!''  

व्याह्यांबद्दल थट्टेचे, चेष्टामस्करीचे उद्गार त्यांची विहीण ह्या गीतात काढते.
व्याही बाजाराला गेले होते तेव्हा त्यांची झालेली फजिती त्यांच्या विहिणीने या रांगड्या शब्दांमध्ये वर्णन केली आहे.
गये ते जखौरा की हाट रे मोरे रंजन भौंरा |
गये ते गधैया के पास रे मोरे रंजन भौंरा |
गधैया ने मारी लात रे मोरे रंजन भौंरा |
ऐंगरे टूटे टेंगरे टूटे टूटी है लंगडे की टौन रे मोरे रंजन भौंरा |
अब कैसे निगै मोरे रंजन भौंरा |
ल्याऔ चनन कौ चून रेमोरे रंजन भौंरा |
ऐंगरे जोडे टेंगडे जोडें जोडें लंगडे की टौन रे मोरे रंजन भौंरा |
गये ते जखौरा की हाट रे मोरे रंजन भौंरा |

स्त्रिया गातात - हे माझे मन प्रसन्न करणार्‍या भ्रमरा! आमचे व्याही जखौरा गावाच्या बाजाराला गेले होते. तिथे ते एका गाढवी (पर-स्त्री)च्या जवळ गेले. त्या गाढवी (युवती) ने त्यांना अशी काही लाथ मारली की त्यांचे अंग अन् अंग खिळखिळे झाले आणि आमच्या लंगड्या व्याह्यांचा गुडघाच निखळला! अरे माझ्या भ्रमरा! आता ते कसे चालणार? अरे माझ्या भ्रमरा, चण्याचे पीठ आणा. त्याने मी आमच्या व्याह्यांची तुटलेली हाडे - बरगड्या जोडून देते आणि व्याह्यांचा निखळलेला गुडघा पुन्हा जोडून देते. 

आणि ह्या गारी गीतात व्याह्यांच्या संशयी स्वभावाचा कसा पुरेपूर व्यंगमय समाचार घेतला आहे बघा!

कुत्ता पाल लो नये समधी जजमान कुत्ता पाल लो
कुत्ता के राखे से मिलै ऐन चैन
समधिन की रखवारी करै दिन रैन
स्वाद चाख लो कुत्ता पाल लो...
कुत्ता के राखे कौ आसरौ बिलात
समधिन के पीछें लगौ रहे दिन रात
जरा देख लो | कुत्ता पाल लो....
कुत्ता के राखे से पुरा जग जाये
समधिन के आगे पीछे लगौ जाये
जरा देख लो.... कुत्ता पाल लो |

स्त्रिया म्हणतात, अहो पाहुणे, अहो व्याही महाशय, तुम्ही आमचे ऐका आणि एक कुत्रा पाळाच! कुत्रा पाळल्यावर तुम्हाला खूप आराम मिळेल. तो तुमच्या पत्नीची दिवसरात्र राखण करेल आणि मग तुम्ही निवांत होऊन परस्त्रीचे सुख घेऊ शकाल! कुत्रा पाळल्यामुळे तुमची बरीच मदत होईल. तो दिवसरात्र तुमच्या पत्नीच्या - विहीणबाईंच्या आगेमागे करेल. कुत्रा भुंकल्यावर सारे शेजारी जागे होतील. त्यामुळे तुमच्या पत्नीला भेटायला कोणी येऊ शकणार नाही, किंवा तीही कोणाकडे जाऊ शकणार नाही! अहो व्याही महाशय, तुम्ही आमचे ऐकाच व कुत्रा पाळून बघा, त्यामुळे तुम्हाला किती आराम मिळतो ते!

माळवा प्रांतातही विशेष शुभ प्रसंगी गारी गीते गायची परंपरा आहे. 'जच्चा' म्हणजे नवप्रसूत मातेला उद्देशून अनेक व्यंग-विनोदपूर्ण गारी गीते रचली गेली आहेत. त्यातीलच हे एक गारी गीत :

बऊअरि, ओ मेरी बऊअरि
तुम मेरी बऊअरी न हो ||

बऊअरि, बै तो बसै बिन्दाबन-बसे बिन्दाबन 
गरबु तुमें कौन कौ जी म्हाराज ||१||

सासुलि, ओ मेरी सासुलि,
तुम मेरी सासुलि न हो ||

सासुलि - बे तौ दिन कों बसें बिन्दाबन
राति को घर आइयेजी म्हाराज ||२||

सासूने थट्टा-मस्करीत नवप्रसूत सुनेला विचारले, ''माझ्या प्रिय सुने, तू माझी प्रिय सून आहेस ना? माझा मुलगा तर परदेशी वृंदावनात राहतो. मग तू कोणाचा गर्भ धारण केलास?''
नवप्रसूत सुनेने समाधानाने उत्तर दिले, ''माझ्या प्रिय सासूबाई, तुम्ही तर माझ्या लाडक्या सासूबाई आहात. माझे पती दिवसा वृंदावनात - परदेशी राहतात. पण रात्री माझ्यापाशी घरी परत येतात. मी त्यांचाच गर्भ धारण केला!''

विहिणीसाठी गाण्याची गारी गीतेही खास आहेत. तिखट चणे खाण्यावरून विहिणीची केलेली ही थट्टा-मस्करी :

अरे चने वाले रे गलियों में तूने शोर किया
समधन मोर बड़ी चटोरी, भर भर दोने खाती है
चाटा पत्ता फेंक दिया रे, पल्ले से मुहँ पोछ लिया ।।
समधन मेरी बड़ी हठीली, लाल मिर्च डलवाती है ।
मुखड़ा सारा लाल हुआ रे, सी सी का शोर मचाती है।। अरे चने वाले.
आधुनिक काळात रचलेल्या एका गाण्यात विहिणीच्या म्हणजेच समधनच्या एके काळच्या तारुण्याचे वर्णन करून आता ते तारुण्य कसे ओसरले आहे याचे व्यंगपूर्ण वर्णन आहे :

आज मेरी समधन बिके है कोई ले लो ।
अठन्नी नहीं है चवन्नी में लो,
अगर जेब खाली बिना दाम ले लो ।
जब मेरी समधन थी नई नवेली,
तब तो अषर्फी मे तोली गई थी ।
गालों की सुर्खी, ये आँखो की मस्ती,
ये लाखों की बोलियाँ बोली गई थी। आज....
जाओ जी तुमसे ना सौदा करेगें ।
अगर ऐसे तोहफे को ठुकरा चलोगे,
जिगर थाम लोगे सदा गम करोगे ।
ये नीलम सी आँखें, ये गालो की लाली,
ये हर मनचले के दिलों की कयामत,
अषर्फी नहीं है तो रूपये में ले लो ।
रुपया नहीं है तो बिना दाम ले लो ।। आज....

विहिणीला (मुलाच्या मातेला) गारी देणार्‍या 'उबटन' किंवा 'उटणे' लावतानाच्या गीतात सरळ सरळ वधुपक्षाच्या स्त्रिया म्हणतात, 'धिया के गोड झिलिया हो बाबा सतभतरी पुता के लेगेतेई'.... म्हणजे वधूच्या पायांना उटणे लावून झाल्यावर त्या उटण्याचा उरलेला अंश सतभतरीच्या (ज्या स्त्रीने सात पती केलेत अशा) वरमाईच्या पुत्राला (वराला) लावला जाईल! 

लोकसाहित्यातील गारीगीतांमधून कृष्ण-राधा-गोपी, प्रभू रामचंद्र-सीता-लक्ष्मण हेही सुटले नाहीत. गोपींनी कान्ह्याला दिलेल्या गारी या एकाच वेळी भावमधुर, भक्तिरसपूर्ण व त्यांच्या लटक्या रागाचे दर्शन घडवणार्‍या आहेत. एका गारी गीतात गोपसख्या गातात,
आवो री आवो तुम, गावो री गारी तुम
देवो री गारी तुम, मोहन को जी जी॥

फागुन में रसिया घर बारी, फागुन में फागुन में,
हां हां बोलत गलियन डोले गारी दे दे मतवारी॥
फागुन में॥

लाज धरी छपरन के ऊपर, आप भये हैं अधिकारी॥
फागुन में॥

प्रभू रामचंद्र व लक्ष्मणाला महिला गारी देतात तेव्हा त्या ज्या प्रकारे  या दशरथपुत्रांच्या जन्मकहाणीचा वापर करून दशरथपुत्रांना ' काय हो, आम्ही जे ऐकलंय ते खरं आहे का? अयोध्येच्या स्त्रिया एक तर पुरुषांपासून दूर राहतात, खीर खातात आणि पुत्रांना जन्म देतात हे खरे का?' असे विचारतात, राम-लक्ष्मणाला त्यांच्या श्यामल-गौर कायावर्णावरून छेडतात, त्यावरून त्यांच्या कुतूहलाचे, चौकसपणाचे व वाक्चातुर्याचे दर्शन घडते. त्या पुढे म्हणतात, 'त्राटिका नार तुम्हाला पाहून अरण्यातून धावत काय आली, तुम्ही धरणीला म्हणे बाणाने छेदलेत,  त्यात असे काय मोठे कर्तृत्व? तुमची स्त्री तुम्हाला सोडून ऋषींच्या सोबत राहिली ते खरं आहे का? आम्ही ज्या खर्‍या गोष्टी बोलतोय, त्यांच्याबद्दल, हे लाला, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका!' 

हमनें सुनी अबध की नारी दूर रहैं पुरसन सें ।
खीर खाय सुत पैदा करतीं लाला बड़े जतन सें ।।
नार ताड़का तुमें देखकें दौरी आई बन सें ।
कछु करतूत बनी नइं तुमसें धर छेदी बानन सें ।।
बैन तुमायी तुमें छोड़कें जाय बसी रिसियन कें ।
बुरो मान जिन जइयो लाला इन साँची बातन सें ।।
साँची झूठी तुम सब जानो का कै सकत बड़न सें ।
लगत रओ नीको लाला आये हते जा दिन सें ।। टेक ।।

शिव-पार्वती विवाह प्रसंगावरूनही काही गारी-गीतांच्या रचना बेतल्या आहेत. एका गारी गीतात पार्वतीची एक सखी दुसर्‍या सखीला सांगते, ''आताच मी पार्वतीचे पती शंभूनाथांना पाहून आले!'' ती सांगते,

मैं देख आइ गुइयां री.
जे पारबती के सैंया || 

सांप की लगी लंगोटी
करिया चढो कंधइयां री 
जे पारबती के सैंया || मैं देख.

गांजे भांग की लगी पनरियां
पीवे लोग लुगइयां री
जे पारबती के सैंया || मैं देख.

साठ बरस के भोले बाबा
गौरी हैं लरकइयां री
जे पारबती के सैंया || मैं देख.

तुलसीदास भजो भगवाना
हैं तीन लोक के सैंया री
जे पारबती के सैंया || मैं देख.

भोलेबाबा साठ वर्षाचे आहेत  आणि त्यांच्या होणार्‍या पत्नीचं, गौरीचं वय अजून लहान आहे. ते गांजा पीतात, भांग पीतात. साप धारण करतात. एक गोष्ट मात्र खास आहे की ते तिन्ही लोकांचे स्वामी आहेत! 

नव्या काळात वेगळ्या प्रकारच्या गारी गीतांची रचना होते आहे खरी, पण एकंदरीतच गारी गीतांमधील विनोदी, व्यंगात्मक किंवा सवंगतापूर्ण आशय सोडला तर अनेक ठिकाणी गीतांमध्ये आढळणारे हुंडा, मानपान, आहेर, वंशवृद्धीसाठी पुत्राचा आग्रह इत्यादींचे सहज उल्लेख आजच्या जमान्यात खरे तर अस्वस्थ करणारे आहेत. 

एका बुंदेली गारी गीतात स्त्रीची तुलना गायीशी केली आहे :

सुनो गउअन की अरज मुरारी हो मोरी प्रभु कीजिये सहाय
बम्बई कलकत्ता औं झाँसी मक्का औअं मदीना कासी 
लगती जाँ गउअन की फाँसी जहाँ होये रहे है कत्ल अपार हो...

मेरे गोबर कामै आवै दूध पीनेसे पित्त शांत हो जावै
घींव से कमजोरी कम जावै इन तीनों से जीवे सकल नर नारी हो...

बछडा दाँये हर में जुताई इनकी खायी खूब कमाई
बेचन लै गये मोल कसाई उनकी गरदन छुरी चलाई
वे तो रोवत हैं अँसुअन ढार हो....

हिन्दू मुसलमान औं इसइया मोरे कोउ नहीं हैं रखवइया
मो को भारत रोज कसइया डूबत अब भारत की नैया
दैया मैया दीन तुम्हार हो....
अर्थ : हे भगवान कृष्णा! आम्हा गायींची विनंती ऐकून आमचा त्रास हरण करायला धावून ये. मुंबई, कलकत्ता, मदीना, झांसी, मक्का, काशी सगळीकडे गायींना फाशी दिले जात आहे - खुलेआम त्यांची कत्तल केली जात आहे. माझे गोमय शेती व घराच्या कामांमध्ये वापरले जाते. माझ्या दुधाने पित्त शांत होते. तुपाने शरीरात बळ येते. आमच्या ह्या तीनही गोष्टींवर स्त्री-पुरुषांचे जीवन चालते. आमच्या बछड्यांना नांगराला जुंपून शेतात ढोरमेहनत करायला लावतात व त्यांच्या आधारावर खूप कमाई करतात. जेव्हा ते काम करण्यालायक उरत नाहीत तेव्हा त्यांना कसायाला विकून टाकतात. कसाई त्यांच्या मानेवर धारदार सुरा फिरवून त्यांचे धड वेगळे करतात. कसायाकडे बैल रडत असतात पण त्यांचा हंबरडा ऐकणारे कोणीच नसते! हिंदू, मुसलमान व ख्रिश्चन यांमधील कोणीच आमचे रक्षण करत नाही. आम्हाला रोज कसाई मारतात. हे भारताच्या अधःपतनाचेच लक्षण नव्हे काय? हे प्रभू! तुमच्या गायींची दशा हीन दीन आहे. तुम्हीच त्यांचे साहाय्य करा. हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन या सर्व जातींमध्ये स्त्रीची स्थिती गायीप्रमाणेच हीन दीन आहे. 

लोकगीते जनसमुदायाच्या मनाचा आरसा असतात व मानली जातात. ग्रामीण भारताच्या जीवनशैलीचा ती एक अविभाज्य हिस्सा आहेत. आयुष्यातील अनेकविध टप्प्यांवर आधारित, कोणत्याही प्रसंगावर आधारित लोकगीते माणसांची अगदी जन्मापासून मृत्यूपर्यंत साथ करतात. त्यांच्यातील आशयाचा मनुष्यमनावर नक्कीच कोठेतरी परिणाम होत असणार! बदलत्या काळानुसार गारी गीतांच्या आशयातही फरक पडावा अशी अपेक्षा करणे व्यर्थ आहे का? गारी गीतांतून भारताच्या बहुजन समाजाचे, जतन केल्या जाणार्‍या काही प्रथांचे प्रकट होणारे हे चित्र भारतीय समाजाची आजही अस्तित्वात असलेली मानसिकता दर्शविते असेच म्हणावे का, यावरही चिंतन आवश्यक आहे. 

लेखिका: अरुंधती कुलकर्णी
[संदर्भ : बिहार के संस्कार गीत, बुंदेली लोकगीत, संस्कार गीत माळवा, राजस्थानी लोकगीतांच्या संकलनाची मध्य प्रदेश सरकारने प्रकाशित केलेली ई-पुस्तके.]

1 टिप्पणी:

SUDHIR KANDALKAR सुधीर कांदळकर म्हणाले...

छान. आवडले. सर्व गीतांचा भावार्थ दिला असता तर बरे झाले असते. मूळ भाषा/बोली तशी कठीणच आहे.