संपादकीय!

विनोदी विशेषांकासाठी संपादकीय लिहायचं म्हणजे फार आव्हानात्मक प्रकार आहे. खरं तर विनोदी अंक काढणं हेच बर्‍यापैकी मोठं आव्हान आहे. असो पण तूर्तास फक्त संपादकीयाविषयी बोलू. तर आव्हानात्मक अशासाठी की वाक्यावाक्याला खळखळून हसायला आलं पाहिजे अशी वाचकांची अपेक्षा असते. ती अपेक्षा पूर्ण करत विनोदी लिहावं तर अशीही खबरदारी घ्यावी लागते की विनोदी लिखाण (संपादकीय) हे विनोदी वाटेवाटेतो हास्यास्पद होण्याच्या पातळीला जाता कामा नये. कारण दोन्हीतली सीमा बर्‍यापैकी निसरडी आहे आणि विनोदी लिहिता लिहिता कधी पाय घसरून 'हास्यास्पद'वाल्या धरतीवर नाक घासायची पाळी येते ते कळतही नाही. थोडक्यात एवढे सगळे निसरडे कोपरे ध्यानात घेऊन मी आधीच ठरवून टाकलं की काहीही झालं तरी संपादकीय हे विनोदी वगैरे लिहिण्याच्या भानगडीत पडायचं नाही (आपोआपच ते हास्यास्पद होण्याचं टळलं !!) आणि वर "अंकात प्रदर्शित झालेल्या मतांशी --संपादकीय धरून-- संपादक सहमत असेलच असे नाही" अशी तळटीप टाकायची की झालं काम. नरो वा कुंजरो वा !!

असो... तर हास्यगाऽऽरवा उर्फ होळी विशेषांकाचं हे आपलं तिसरं वर्ष. आहां.. पण खरी गंमत तिथेच आहे. हे तिसरं वर्ष असलं तरी लौकिक जगताच्या गणिताप्रमाणे  तिसरं वर्ष म्हणजे हा तिसरा अंक असेल असं तुम्ही गृहीत धरलं असाल तर तुम्ही साफ गंडलेले आहात...थांबा,थांबा. विस्कटतोय. थोडा धीर धरा.. !

डिसेंबर २००९ मध्ये सर्वप्रथम 'शब्दगाऽऽरवा' हा जालरंग प्रकाशनाचा पहिला जालीय अंक निघाला. अर्थात तेव्हा जालरंग प्रकाशन वगैरे काहीही नव्हतं. देवकाका आणि इतर हौशी ब्लॉगर्सनी मिळून या जालीय अंक प्रकाराची सुरुवात केली. त्यानंतर तीनच महिन्यात 'हास्यगाऽऽरवा' असा पुढचा अंक निघाला. कालांतराने या सगळ्याला 'जालरंग प्रकाशन' असं नाव देण्यात आलं. आणि दर तीन ते चार महिन्यांनी जालरंग प्रकाशनाचे शब्दगाऽऽरवा, हास्यगाऽऽरवा, (श्रावणात निघणारा) ऋतूहिरवा, दिवाळी अंक असे एकेक नवनवीन कल्पनांनी भरलेले आणि भारलेले अंक रसिकांच्या भेटीस येत राहिले. आधीच दर ३-४ महिन्यांनी जालीय अंक काढणं ही स्वतःतच एक आगळीवेगळी कल्पना होती. कारण तोपर्यंत रसिकांना फक्त दिवाळी अंक हा प्रकार माहीत होता. जालरंग प्रकाशनाने रसिकांना दर तीन महिन्यांनी अंक निघू शकतो या कल्पनेवर विश्वास ठेवण्यास भाग पाडलं, असं करता करता २०१० च्या ऑगस्टमध्ये एक अतिशय वेगळ्याच प्रकारचा प्रयत्न केला गेला. लोकांना कितपत आवडेल किंवा त्या कल्पनेला लोकांचा किती पाठिंबा मिळेल याबद्दल आम्ही सर्वजणच जरा साशंक होतो. तर त्या अंकाचं नाव होतं 'जालवाणी'. त्यात एकही लेख, कविता शब्दस्वरुपात नव्हते. हा अंक ध्वनीमुद्रित विशेषांक होता. पूर्णतः श्राव्य स्वरूपाचा. त्यात होते ते सगळे लेख/कविता स्वतः लेखकांनी स्वतःच्या आवाजात ध्वनिमुद्रित केले होते. ही कल्पना निश्चितच विलक्षण आगळीवेगळी होती. फक्त आणि फक्त ध्वनिमुद्रित स्वरूपातला हा पहिला जालीय अंक होता. रसिकांनीही ती कल्पना तुफान डोक्यावर घेतली. थोडक्यात १५ ऑगस्ट २०१० रोजी जालीय अंक बोलू लागले !! जालरंग प्रकाशनाचे अंक तुफ्फान हिट होण्याचं अजून एक अतिशय महत्त्वपूर्ण कारण म्हणजे कुठलंही लेखन नाकारलं जात नाही. संपादकांपर्यंत आलेलं प्रत्येक लेखन स्वीकारलं जातं. हा प्रकारही कुठल्याही जालीय अंकाच्या बाबतीत न आढळणारा !! असो..

मी ही जी वरती बडबड केलीये ती 'पुराव्याने शाबीत करायची' झालीच तर हे घ्या दोन पुरावे. पहिल्या दुव्यात जून २०११ पर्यंत निघालेल्या जालरंगप्रकाशनाच्या विविध अंकांची यादी आहे आणि दुसर्‍या दुव्यात त्या त्या अंकांसंबंधी वेळोवेळी करण्यात आलेल्या उद्घोषणा आहेत.

http://goo.gl/a4ckP

http://goo.gl/jvktK


"दर तीन महिन्यांनी नवीन अंक निघतो" हे वाक्य अतिशयोक्तिपूर्ण किंवा विनोदीच वाटण्याचा संभव केव्हाही जास्त. परंतु ते अतिशयोक्तिपूर्ण नाही की विनोदी नाही. सब फॅक्ट्स हय भाय. स्वतः त्या दुव्यांवर टिचक्या मारून तपासून बघा. आता कळलं मी मगाशी का म्हणत होतो की मी संपादकीय विनोदी लिहिण्याच्या भानगडीत पडणार नाही म्हणून. कारण खरं लिहिलं तरी विनोदी (आणि कदाचित खोटं) वाटण्याची शक्यता अधिक.

"सांगे वडिलांची कीर्ती, तो येक मूर्ख" हे समर्थांनी सांगितलेलं मूर्खाचं लक्षण ठाऊक असूनही तरीही जालीय अंक प्रकारात 'बाप' असणार्‍या जालरंग प्रकाशनाच्या अंकांबद्दल स्वतःच एवढी माहिती देण्याला अजूनही एक कारण आहे. आपल्या मराठी भाषेची मनापासून सेवा करणारी अनेक चांगली आणि जुनी संकेतस्थळं उपलब्ध आहेत. जालरंग प्रकाशनाला (उद्घोषणा करण्यासाठी) वेळोवेळी त्यांची मदतही झालेली आहे. परंतु 'ग' ची कावीळ झाल्याने सगळं जालीय जगच पिवळं दिसणार्‍या काही आयड्यांना (छ्या छ्या.. शिवी नाही हो.. आयडी चं अनेक वचन) देवकाका स्वतःचा फायदा (??? !!!!) करून घेण्यासाठी त्या आयड्यांच्या (म्हंजी वो???) संकेतस्थळाचा वापर करून घेताहेत असा स्वघोषित साक्षात्कार झाला. तेव्हा अशा काही आयड्यांना जालरंग प्रकाशनाचा प्रवास, मेहनत, कळकळ (आणि यातून कोणालाही आर्थिक फायदा कसा होत नाही) हे सगळं थोडक्यात दाखवावं या दुसर्‍या उद्देशाने हा प्रवास थोडक्यात मांडला.

"कोणत्याही प्रसिद्ध हयात/मृत व्यक्तीची नावानिशी टिंगलटवाळी केलेली चालणार नाही." अशा सूचनेनुसार खरं तर मी त्या आयड्यांची जाहीर नावं घेऊनही टिंगलटवाळी करू शकलो असतो कारण या काही व्यक्ती नाहीत.. या आयड्या आहेत फक्त. खर्‍या-खोट्या लोकांनी खरी-खोटी नावं घेऊन धारण केलेली खोटी रूपं. त्यामुळे नावं घेऊन टिंगल करूनही मी नियम मोडला असं काही झालं नसतं पण तरीही नावं न घेताच जर काम होतंय तर अजून खोलात कशाला जा !! आणि अर्थात या गळे काढणार्‍या आयडीज अतिशय थोड्या आहेत.. आणि मुख्य म्हणजे 'नेहमीच्या यशस्वी' आहेत. तेव्हा असल्यांकडे लक्ष देण्याएवढा आपल्याकडे वेळ नाही, गरज नाही आणि त्यांची तेवढी लायकीही नाही.. आणि मुख्य म्हणजे असे काही विघ्नसंतोषी वगळता बाकी सगळे आपलेच तर आहेत !!!

खरं तर संपादकाने निष्पक्षपातीपणे लेखन करणं अपेक्षित असतं पण म्हणून त्याने 'खटासी असावे खट, उद्धटासी उद्धट' या संतवचनाला विसरावं असाही काही नियम नाही. तस्मात् या वचनानुसार मी निष्पक्षपातीच आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी काही हाडाचा संपादक नाही त्यामुळे थोडं इकडंचं तिकडे चालतं हो..... आणि अर्थात हे असलं संपादकीय वाचून तुमच्या ते एव्हाना लक्षातही आलं असेल. असो आपण पुन्हा एकदा आपल्या हास्यगाऽऽरव्याकडे वळू. आपला यावेळचा हास्यगाऽऽरवा नेहमीप्रमाणेच निरनिराळ्या लेखनप्रकारांनी सजलेला आहे.

त्यात श्री अरविंद रामचंद्र बुधकर यांनी लिहिलेली चार खुसखुशीत विडंबनं आहेत, विनायक पंडित यांनी लिहिलेली आणि स्वतःच्या आवाजात ध्वनिमुद्रित केलेली दोन अतिशय सुंदर प्रहसनं आहेत. राजस्थान, छत्तिसगढ इत्यादींसारख्या राज्यांत विवाह किंवा तत्सम शुभप्रसंगांच्या वेळी गायली जाणारी व्यंगात्मक किंवा शिव्यांनी भरलेल्या गारी(ली) गीतं अशा वेगळ्या प्रकारच्या लोकगीतांवर असणारा अरुंधती कुलकर्णी यांचा भन्नाट लेख आणि तितकाच अमित गुहागरकर यांचा एकदम ४४० व्होल्टचा झटका देणारा 'शॉक' लेख आहे !! गंगाधर मुटे यांची एक खणखणीत हझल आहे आणि देवकाकांच्या स्वतःच्या आवाजातल्या होळीच्या आठवणी आहेत... अनिताताई आठवले आणि विजयकुमार देशपांडे यांचे खळखळून हसवणारे विनोदी किस्से आहेत आणि विजयकुमार देशपांडे यांचं एक नर्मविनोदी काव्यही आहे. नरेंद्र गोळे यांचा चित्रकविता हा एक आगळावेगळा प्रकार आहे आणि विशेष म्हणजे शशिकांत गोखले आणि अथर्व गोखले या आजोबा आणि नातवाच्या जोडीने सादर केलेलं एक सुंदर अभिवाचन आहे. एकुणात अगदी भरगच्च म्हणता येणार नसला (विनोदी अंकाचं नेहमीचं दुखणं !) तरी विनोदांच्या आगळ्यावेगळ्या प्रकारांनी भरलेला हा आमचा हास्यगाऽऽरवा वाचताना न बिचकता अगदी मनसोक्त हसा कारण प्रत्येकच टवाळाला विनोद आवडत असला तरी विनोद आवडणारा प्रत्येकच जण टवाळच असतो असं काही नाही !! तेव्हा होऊ द्या जोरदार हाहाहूहू !!

वाचकांना सूचना : अंकात प्रदर्शित झालेल्या मतांशी (आणि संपादकीयाशीही) संपादक सहमत असेलच असे नाही परंतु संपादकीयाशी मात्र देव काका आणि अंकात लेखन प्रकाशित झालेले सर्वजण लेखक सहमत असतीलच असतील याची खात्री बाळगा (कारण नियमच आहे तसा यावेळचा) आणि त्यामुळे काही तक्रारी, सल्ले, सूचना, नापसंतीदर्शक प्रतिक्रिया इ इ इ सगळं देवकाकांना मेल करा आणि हे वगळून जे काही कौतुकास्पद, स्तुतिपर वगैरे वगैरे जे काही असेल ते मला मेल करा.

कळावे,
आपलाच,

हेरंब ओक

१९ टिप्पण्या:

सचिन उथळे-पाटील म्हणाले...

जबरदस्त रे .... चाबूक संपादकीय झालंय.

Suhas Diwakar Zele म्हणाले...

संपादकीय एकदम दणकेबाज... खूप जणांना दणके बसले असतील त्यांच्याबद्दल (आनंदपूर्वक) सहानुभूती आहेच :) :)

तुम्हा सगळ्यांच्या मेहनतीला सलाम. आता अंक वाचायला घेतो.

क्रांति म्हणाले...

अरे वा! मस्त संपादकीय! सुरुवातच इतकी जोरदार, म्हणजे अंकही तसाच असणार यात शंकाच नाही. चला, एकंदरीत होळी जोरदार होणार आणि हसून हसून पोटदुखी होणार, हे नक्की. :) [पोटदुखी फक्त हसूनच होणार हो! अन्य कोणत्याही कारणांनी नाही, याची पूर्ण हमी देते. :)]

mau म्हणाले...

वाह वाह वाह !! संपादकीय सुरुवात तर सुंदरच !!! नक्कीच आवडेल असे दिसतेय..

THE PROPHET म्हणाले...

दादा जोरदार रे....
जालरंग प्रकाशनाचा प्रवास खरंच थक्क करणारा आहे...
हाथी चले अपनी चाल म्हणायचं आणि कुत्र्यांना भुंकू द्यायचं निवांत!!
आपली होळी मस्त करायची फक्त! :)
अभिनंदन सर्वांचेच!! अंक मस्त झालेला दिसतोय.. आता वाचतो एक एक करून..

Unique Poet ! म्हणाले...

क्या बात है ! एक नंबर ...! :)

मस्तच झालंय संपादकीय ! आता जरा आत डोकावतो ... सर्वांचे अभिनंदन !

आनंद पत्रे म्हणाले...

बेस.. जोरदार ओपनिंग...

Pramod M. Katkhade म्हणाले...

संपादकीय सुंदरच ............
पुढचा अंक निवांत पणे वाचू

Unknown म्हणाले...

वा काय संपादकीय झालंय हो हेरंब काका .. चला ह्या निमित्ताने जालावर काहीतरी वाचून होईल :)

बाकी ब्लॉग च्या मराठीकारणामुळे वर एक हास्य लाट उठली , क्रांतीताईंच्या कमेंट वर "क्रांती म्हणाले " हे हसवून गेले ;)

बाकी देव काका जिंदाबाद !!

- आरंभ जोक

विनायक पंडित म्हणाले...

जबरा झालंय संपादकीय बॉ! आता वाचक, श्रोते काय काय म्हणताएत याची उत्सुकता आहे! सर्वांचं मन:पूर्वक अभिनंदन आणि सगळ्याना होळीच्या खूप खुप शुभेच्छा!:)

अनामित म्हणाले...

संपादकीय उत्कृष्ट झालंय यात शंकाच नाही. योग्य जागी बोटं लावली आहेत.. (स्दर्भ:- बोट लावेल तिथे गुदगुल्या )

Mahendra Kulkarni म्हणाले...

हेरंब,
संपादकीय छान जमलंय.. आता वाचणं सुरुकरतो

Alvika म्हणाले...

खरच, कौतुस्कापद आहे सर्व. थोडाथोड वाचते.

भानस म्हणाले...

हेरंब, एकदम झकास झालेय संपादकीय! आता अंकाच्या अपेक्षा वाढल्यात.. :)

Gangadhar Mute म्हणाले...

संपादकीय बहारदार झालेय.

सर्व संपादक मंडळ, लेखक आणि वाचकांना होळीच्या रंगबेरंगी आणि चित्रविचित्र भयानक भांगपूर्ण शुभेच्छा.

- गंगाधर मुटे

देवदत्त म्हणाले...

आगळं वेगळं संपादकीय. मस्त एकदम :)
इतर लेख ही वाचण्यास घेतो जमेल तसे

Meenal Gadre. म्हणाले...

आरंभ जोक चे हे ही लेखन आवडले. मोकळे ढाकळे आहे.

हेरंब म्हणाले...

सचिन, सुहास, क्रांतीताई, माऊ, बाबा, समीर, आप्पा, प्रमोद, टारझन, विनायककाका, अनामिक, महेंद्रकाका, अल्विका, श्रीताई, मुटेजी, देगा, मीनल,

सर्वप्रथम प्रतिक्रियेला उत्तर द्यायला एवढा वेळ घेतल्याबद्दल सर्वांची जाहीर माफी मागतो. आणि इतक्या सुंदर आणि उत्साहवर्धक, कौतुक करणाऱ्या वगैरे वगैरे प्रतिक्रियांबद्दल जाहीर आभारही मानतो :) .. धन्यवाद !!

Gruhakhoj.com म्हणाले...

I read this amazing article and found that it is actually very good and has information for all.
सांगली, कोल्हापूर ऑनलाईन प्रॉपर्टी एक्स्पो २०२० - २०२१ , सर्व माहिती मोफत मिळवा = visit gruhkhoj .